Raj Thackeray on Alliance : युतीचा विषय संवेदनशील,भाष्य करु नका! राज ठाकरेंच्या नेत्यांना सूचना!
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्याची साद घातली. यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरुन विविध राजकीय चर्चा सुरु आहे. राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच आहे, असं अनेकजण बोलताना दिसले. मात्र आता राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
संवेदनशील विषयावर 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत 29 तारखेपर्यंत बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत एबीपी माझाला माहिती दिली. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.