Jaykumar Gore : पोलिसांशिवाय अवैध वाळू उपसा अशक्य, जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य... ABP MAJHA
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचा अवैध वाळू उपसा बंद होत असताना पंढरपूर भागात मात्र सुरू असलेल्या वाळू उपशावर आज पालकमंत्र्यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला कठोर शब्दात सुनावले.
अवैध वाळू उपशाला महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा पाठिंबा असल्याशिवाय किंवा यातील एखादा त्यात पार्टनर असल्याशिवाय अवैध वाळू उपसा चालू शकत नाही अशा शब्दात आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याबाबत या दोन्हीही विभागाने कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले असून यात जर कोणी कसूर केली तर त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल अशा स्पष्ट इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. सध्या दुष्काळ चालू असताना वाळूच्या साठी माफिया बंधाऱ्याचे दारी उघडून वाळू उपसा करताना हे निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्री भडकले. यावेळी त्यांनी कोणत्याही ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू ठेवायचा नाही असे जर महसूल व पोलीस प्रशासनाने ठरविले तर कोणताही वाळू उपसा होऊ शकत नाही हे वास्तव असताना पंढरपूर परिसरात सुरू असलेला बेकायदा वाळू उपशामध्ये या दोन्हीपैकी कोण पार्टनर आहे असा थेट सवाल गोरे यांनी केला. त्यामुळे आता पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर गोष्टीकडे लक्ष द्यावे अन्यथा कडक कारवाईला सामोरा जाण्याची तयारी ठेवावी अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी फटकारले.