Narendra Modi on Pahalgam Attack : सजा मिलेगी, मिट्टी में मिला देंगे! पहलगाम हल्ल्यावर मोदी आक्रमक
पहलगाम दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानविरुद्ध 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बुधवारी हे निर्णय सरकारने जारी केल्यानंतर आज नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असून येथील जनतेला संबोधित करण्यापूर्वी आपल्या भाषणाआधी त्यांनी 2 मिनिटे मौन बाळगत पहलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणातून मोदींनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला आहे. पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही मातीत गाडण्याची वेळ आलीय, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला (Pakistan) थेट इशारा दिला आहे.
बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्याहस्ते गॅस, ऊर्जा, रेल्वे विभागातील विविध 13,483 कोटींच्या विकासकामांची घोषणा आणि काही कामांचे लोकार्पण मोदींच्याहस्ते करण्यात आले. यावेळी, बोलताना पहलगाम हल्ल्यातील घटनेवर मोदींनी दु:ख व्यक्त केलं. देशात आज कोटी कोटी भारतीय रडत आहेत, मृत पर्यटकांचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. पण, आज संपूर्ण देश या कुटुंबीयांसोबत आहे. या हल्ल्यात अनेकांनी आपला जोडीदार गमावला, काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दु:ख एकसारखंच आहे, आपला आक्रोश एकसारखाच आहे. हा हल्ला पर्यटकांवर झाला नसून भारताच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हा हल्ला केलाय. ज्यांनी हा हल्ला केलाय, त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, शिक्षा देणारच असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून पाकिस्तानला दिला. तसेच, उनकी बची-खुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है... अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.