मुंबई : येत्या 26 जानेवारी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सर्व विभागातील, भाषेच्या शाळांमध्ये देशभक्तीपर सामूहिक कवायत सादर करतील, अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं दिल्या आहेत. या माध्यमातून शाळांमध्ये कवायतीचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. राष्ट्रप्रथम या संकल्पनेवर आधारित यंदा कवायतीचे आयोजन करण्यात आलं आहे. हा कवायतीचा कार्यक्रम सकाळी ध्वजारोहणानंतर संबंधित शाळा आणि स्थानिक प्रशासनानं नियोजित केलेल्या जागेवर होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्ट्या कसरती, व्यायाम आदींसाठी प्रेरणा मिळावी, असे प्रयोजन यामागे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, दोन कोटी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची या कवायतीची प्रॅक्टिस घेण्यात आली आहे.