नागपूर: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आज, सोमवारी (26 जानेवारी) ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी नागपूर शहरातील संघाचे पदाधिकारी तसेच शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असल्यानं ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महानगर संघचालक राजेश लोया म्हणाले की, "भारत हा केवळ एक देश नसून एक जिवंत लोकशाही आहे. आपलं आचरण संविधानाच्या चौकटीत असलं पाहिजे. सहिष्णु विचारसरणी अंगीकारणं, कायद्याचं रोज पालन करणं, लोकांचा सन्मान राखणं आणि राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तसेच जल, जंगल आणि वायू यांचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक असून पाण्याचा वापर मर्यादित व विचारपूर्वक केला पाहिजे," असंही लोया यांनी नमूद केलं. महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देणं, मतदानाचा हक्क बजावणं आणि मतदानासंबंधी समाजात सकारात्मक चर्चा होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.