पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर येरवडा लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक वाहनांची तोडफोड करणाऱ्या 20 वर्षीय आरोपीची पोलिसांनी धिंड काढून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती केली.
ज्या ठिकाणी गुन्हा केला, त्या परिसरात काढली धिंड : या प्रकरणात सुलतान रिजवान शेख (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबंधित आरोपीच्या नावावर तब्बल 22 गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
चौकशीत 22 गुन्हे उघडकीस आले : पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याच्याविरुद्ध एकूण 22 गुन्हे उघडकीस आले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आरोपीनं वाहनांची तोडफोड केली होती, त्याच परिसरात त्याला घेऊन जात पोलिसांनी त्याची धिंड काढत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती केली. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं सांगण्यात आलं.
हेही वाचा